कुलवृत्तांत कशासाठी?

-- ज्येष्ठ पत्रकार कै. वरुणराज चिंतामणी भिडे

कुलवृत्तांत ही कल्पना आता समाजात चांगल्या रीतीने रुजली आहे. आपटे कुलवृत्तांत हा अशा प्रकारचा पहिला उपक्रम, तेव्हापासून आजतागायत कुलवृत्तांत व्हावेत की नाही, हाच वादाचा आणि मतभेदाचा विषय ठरला आहे. ‘कुलवृत्तांत म्हणजे आपले आपल्याभोवती दिवे ओवाळून घेण्याचा प्रकार आहे’, ‘जातीयतेची भावना वाढविणारा हा प्रकार आहे’, ‘अशा कामात आम्हाला रस नाही या प्रकारचे आक्षेप पहिल्या कुलवृत्तांताच्या वेळेपासून घेतले गेले होते, आज घेतले जात आहेत आणि भावी काळातही घेतले जातील. तथापि आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या कुलवृत्तांतांची संख्या शंभराच्या पुढे आहे. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांनी सुरू केलेला उपक्रम तेवढ्या पोटजातीत बराच फोफावला आणि बहुतेक सर्व आडनावे त्यात आली आहेत. जी आठ-दहा आडनावे राहिली आहेत त्यातही कमी अधिक प्रमाणात प्रयत्न झालेले आहेत. ते पूर्ण मात्र झालेले नाहीत. पन्नास पाऊणशे वर्षे चित्पावनात चाललेली ही चळवळ आता इतर जाती-जमातीतही पसरत चालली असल्याचे दिसते, त्यामुळे कितीही आक्षेप घेतले गेले आणि टीका झाली तरी कुलवृत्तांत प्रकाशित होणे थांबणार नाही.
प्रकाशित कुलवृत्तांतांची संख्या शंभराच्या पुढे आहे, असे म्हटले असले तरी तेवढी आडनावे मात्र झालेली नाहीत. काही कुलवृत्तांतांच्या दोन आवृत्त्या झाल्या आहेत तर काहीच्या तिसऱ्या निघाल्या आहेत. चित्पावनांखेरीज इतरांचे कुलवृत्तांतही दखल घ्यावी इतक्या प्रमाणात आहेत. मुंबई विधानसभेचे आणि लोकसभेचे पहिले सभापती झालेले . वा. तथा दादासाहेब मावळंकर यांच्या पुढाकाराने-सरदेसाई घराण्याचा इतिहास या नावाने प्रसिद्ध झालेला कुलवृत्तांत हा कऱ्हाडे ब्राह्मणांतील पहिला कुलवृत्तांत, मुंबई विधानसभेचे दुसरे सभापती कुंदन साहेब तथा भाऊसाहेब फिरोदिया यांनी फिरोदिया कुलवृत्तांत या नावाने राजस्थानातील फिरोद नावाच्या गावातून महाराष्ट्रात आलेल्या आपल्या घराण्याचा तपशील लिहून ठेवला होता. तो त्यांचे चिरंजीव नवलमल फिरोदिया आणि हस्तिमल फिरोदिया यांनी मी कुंदनमल अशा नावाने छापून काढला आहे. मारवाडी जैन समाजातील हा असा पहिला उपक्रम. सोलापूरचे प्रसिद्ध पत्रकार बाबूराव जक्कल यांच्या पुढाकाराने जक्कल कुलवृत्तांत प्रकाशित झाला. महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या तेलगुभाषिक पद्मसाळी जातीतील हा पहिला कुलवृत्तांत; याच जातीतील दुसरा प्रयत्न केला तो जनता सहकारी बँकेचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. . ना. कुंदेन यांनी लिहिलेला कुंदेन कुलवृत्तांत हा आहे. कृषीशास्त्रातील संशोधक आणि निवृत्त प्राध्यापक डॉ. आनंदराव कौतिकराव कोल्हे यांनी पिंपरूड कोल्हे कुलवृत्तांत लिहिला आहे. त्यात त्यांनी पिंपरूड या खानदेशातील गावाशी संबंधित असलेल्या कोल्हे घराण्याचा तपशील दिला आहे. लेवा पाटीदार जातीतील हा पहिलाच कुलवृत्तांत आहे. मुंबईचे प्रसिद्ध दानशूर बांधकाम व्यावसायिक सुधीर निरगुडकर यांनी आम्ही निरगुडकर या नावे प्रकाशित केलेला ग्रंथ देशस्थ ब्राह्मणांतील कुलवृत्तांताचा पहिला प्रयोग आहे. माजी आमदार आणि सातारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबूराव बाळाजी घोरपडे यांनी घोरपडे घराण्याचा इतिहास या नावाने ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. मुधोळ, सोंडूर अशा कर्नाटकातील गावांपर्यंत राज्ये स्थापन करणारे घोरपडे घराणे हे पंचकुळी मराठ्यातील खानदानी घराणे म्हणून प्रसिद्ध आहे. ही कामे करणारी माणसे आपापल्या क्षेत्रातील तालेवार माणसे होती. किंबहुना त्यामुळेच त्यांना असे उपक्रम हाती घ्यावेसे वाटले असावे. असे नमुने पाहिल्यावर कुलवृत्तांत प्रकाशित होणे थांबतील असे वाटत नाही.
कुलवृत्तांत प्रकाशित होत आहेत ही गोष्ट खरी, तथापि कुलवृत्तांत कशासाठी प्रकाशित व्हायला हवेत, तसे करणे हा भाबडेपणा नाही तर महत्त्वाचे समाजशास्त्रीय काम आहे हे देखील कुणीतरी ठामपणे आणि सकारण सांगायला हवे. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण जातीतील बहुतेक सर्व आडनावांचे कुलवृत्तांत प्रसिद्ध झाले आहेत. ज्यांचे राहिले आहेत ते आणखी काही वर्षात होण्याची चिन्हे आहेत. चित्पावनांची नेमकी संख्या किती हे सांगणे आता कठीण असले तरी साडेतीन टक्क्यातील अर्धा टक्का त्यांचा असावा, म्हणजे ही संख्या तीन-साडेतीन लाखाच्या पुढे नसावी. या लहानशा का असेना परंतु एका संपूर्ण जमातीतील सर्व व्यक्तींची आणि त्यांच्या घराण्याची नोंद होणे ही जगाच्या समाजशास्त्रीय इतिहासातील अपूर्व आणि अद्वितीय घटना मानावी लागेल, असे असले तरी ही कामे काही फारशी शास्त्रशुद्ध आणि विचारपूर्वक झाली आहेत असे म्हणता येणार नाही. त्यामुळे कुलवृत्तांत कसे असावेत याबाबत समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र अशा विषयातील जाणकारांशी चर्चा करून त्याचा नमुना आणि कार्यपद्धती ठरवायला हवी.
जनगणना किंवा शिरगणती हा प्रकार १८८१ मध्ये सुरू झाला. पहिल्या शिरगणतीचे अहवाल प्रसिद्ध झाले त्यावेळी लोकांना वेगवेगळ्या जातींची संख्या, त्यांचे प्रमाण, संख्येमुळे समाजजीवनावर होणारे परिणाम यांच्या जाणिवा होऊ लागल्या. देशात इंग्रज किती आहेत, याविषयी असणारे लोकांचे अंदाज प्रत्यक्ष आकडेवारी प्रसिद्ध झाल्यावर किती प्रचंड संख्येला काबूत ठेवतात, याची जाणीव झाली. त्यानंतर प्रत्येक शिरगणतीच्या वेळेला चौकशीचे नवे मुद्दे समाविष्ट झाले, जाती, पोटजाती यांच्या नोंदी होईनाशा झाल्या. तथापि त्या निमित्ताने जमा होणारी माहिती देशाचे नियोजन ठरविताना प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडत गेली. शिरगणती हा झाला देशातील सर्वांचा अभ्यास, तर कुलवृत्तांत हा एक आडनावापुरता अभ्यास होतो, तो अधिक समाजशास्त्रीय रीतीने झाला पाहिजे, वेगवेगळ्या शाखांतील लोकांची मदत घेण्याची गरज आहे ती याच दृष्टीने.
अलिकडे सबाल्टर्न हिस्ट्री म्हणजे सामान्य जनांचा इतिहास ही कल्पना रूढ झालेली आहे. आत्तापर्यंत राजे-रजवाड्यांचा इतिहासच अभ्यासला जात होता. त्यात जनता ही महत्त्वाची असते याची जाणीव वाढली आहे. त्यानंतर काँटेपररी हिस्ट्री म्हणजे समकालीन इतिहास ही कल्पना अलिकडेच निर्माण झाली आहे. या दोन्ही दृष्टींनी कुलवृत्तांत अत्यंत महत्त्वाचे ठरतात. बापट कुलवृत्तांत पाहिला तर त्या आडनावात लष्कर आणि पोलीसखात्यात कर्तबगारी दाखविणारे लोक मोठ्या संख्येने दिसतात. इतकेच नव्हे तर घराणीच्या घराणी दिसतात. केळकर आडनावात गणित आणि विज्ञानातील मोठी प्रगती दिसते. मला स्वत:ला राजकारणाविषयी अतिशय कुतूहल आहे. मात्र माझ्या आडनावाचा एकही आमदार किंवा खासदार झालेला आढळला नाही. त्याउलट शांडिल्यगोत्री जोशांमध्ये आमदार, खासदार किंवा मुलकी अधिकारी यांची मालिका दिसते. लष्कर, पोलीस सेवा, मुलकी सेवा, विज्ञान, व्यवसाय, व्यापार, उद्योग, कला, संशोधन अशी क्षेत्रे पाहिली तर त्यात बऱ्याच गंमती आढळतील, साळी आणि कोष्टी या विणकर जातींमध्ये प्रस्थापितांविरुद्धची बंडखोर वृत्ती तसेच कलाकुसर आडळते. सुतार, शिंपी आणि सोनारातही कलावंत आढळतात. माळी कुठल्याही धंद्यात शिरला तरी चोख आणि आर्थिक भान ठेवून अतिशय परिश्रमाने काम करतो. न्हाव्यांमध्ये विलक्षण चतुराई आणि नेमकेपणा दिसतो. हाच प्रकार आडनावातही आढळत असेल तर त्याचा गुणसूत्रांशी आणि वंशशास्त्राशी संबंध आहे का? याचाही अभ्यास करायला ही कामे उपयोगी ठरतील.
जातींच्या जाणिवा निर्माण झाल्या त्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात, तोपर्यंत समाजात जाती होत्या आणि त्या असतात हे गृहीत धरूनच समाजजीवन चालत असे. माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा आल्या आणि भारतीयांना राजकीय अधिकार देण्याचे विचार सुरू झाले, त्यावेळी संख्या हा महत्त्वाचा घटक ठरणार आणि आपला समुदाय संघटित झाला पाहिजे, हे लोकांना जाणवू लागले. त्यातूनच वेगवेगळ्या जातीसंघटना किंवा संस्था सुरू झाल्या. शिक्षणाची जाणीव वाढली, हक्काची जाणीव वाढली. या साऱ्यांचा परिणाम दक्षिणेतील श्रीमंत संस्थानिक, इनामदार, जहागीरदार, सरदार या वर्गाला शिक्षण देण्यासाठी, प्रत्यक्षात कारकून, शाळामास्तर असणाऱ्या कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा खरे तर गरीब लोकांनीच पोटाला चिमटा घेऊन आपली मुले विद्याविभूषित केली. त्यातून त्यांना आधुनिक प्रकारचे रोजगार मिळाले. तथापि शिक्षण वाढत गेले तसे रोजगार मागणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि स्पर्धा वाढू लागली. संख्येच्या बळावर स्पर्धक प्रभावी ठरू लागले. त्यावेळी आधीपासून सरकारी नोकऱ्यात असणारे शांतपणे त्या स्पर्धेतून दूर झाले. आय. . एस., आय. पी. एस. अशा स्पर्धा परीक्षांना बुद्धीमान मराठी मुले जात नाहीत, याची बरीच चर्चा होते. तथापि त्याचा संबंध सामाजिक वातावरणाशी आहे, याची जाणीव लोकांना झालेली दिसत नाही. अठ्ठेचाळीसची जळिते, कूळकायदा आणि संख्यात्मक राजकारण याचा आपल्यावर प्रतिकूल परिणाम होतो आहे, हे लक्षात घेऊन चित्पावन समाजच सरकारी नोकरीपासून उदासीन झाला. मॅट्रिकला पहिला आलेला मुलगा पुढे आय. सी. एस. होणे हे गृहीतच धरले जाई. चिंतामणराव देशमुख, . गो. बर्वे किंवा शरद काळे अशी बरीच उदाहरणे दिसतात. तथापि शरद काळे यांच्यानंतर गेल्या एक्केचाळीस वर्षात एकही पहिला आलेला विद्यार्थी मुलकी सेवांकडे वळला नाही. बुद्धीमान मुले आय. . एस. कडे वळत नाहीत, याबद्दल हळहळ आणि चिंता व्यक्त करणाऱ्यांनी ही प्रवृत्ती का? याचाही कधीतरी विचार करायला हवा.
संख्यात्मक वातावरणात कोंडी होईल या कारणाने ब्राह्मणांनी अशा क्षेत्राकडे पाठ फिरवली असेलही, तथापि अन्य जाती-जमातींतील पहिले आलेलेही अशा परिक्षांबाबत उदासीन झालेले दिसतात. चित्पावन किंवा अन्य महाराष्ट्रीय ब्राह्मणांपुरते बोलायचे झाले तर ते केवळ स्पर्धा परीक्षांपासूनच दूर झाले आहेत असे नव्हे. ते राजकारणापासून दूर गेले आहेत. सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांपासून दूर गेले आहेत. एके काळी कुलकर्णी वतन हे फक्त देशस्थ ब्राह्मणांकडे असे, ते वतन बरखास्त झाले. त्या कामासाठी नेमलेल्या तलाठ्यांची संख्या पाहिली तर त्यात एक टक्काही देशस्थ सापडणार नाहीत. प्राथमिक शिक्षक, सरकारी कारकून, माध्यमिक शिक्षक या पेशात जाणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने कमी होते आहे. घेतले जात नाही, अशी तक्रार करता येईल, तथापि त्या दिशेलाच वळणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. थोडक्यात सांगायचे तर या वर्गाला राज्यसंस्था किंवा स्टेट या संकल्पनेविषयीच उदासीनता आलेली दिसते. इतक्या मोठ्या प्रमाणातील रोजगाराच्या संधी मिळत नसल्या किंवा नकोच असल्या तरी या समाजात गरिबी आली असल्याचे दिसत नाही. माधुकरी मागून शिक्षण घेतल्याची हजारो उदाहरणे गेल्या पिढीपर्यंत सांगितली जात. आता अन्नाला मोताद झाल्याने माधुकरी मागण्याची वेळ राहिलेली नाही. ‘अनाथ विद्यार्थी गृहा राहून शिक्षण घेतल्याचीही अनेक उदाहरणे होती. आज त्याच संस्थेतील विद्यार्थी पाहिले तर तिथे ब्राह्मण मुले हाताच्या बोटावर मोजण्याइतकी सापडतात. देणग्या देणाऱ्यांच्या याद्या पहिल्या तर मात्र त्यात कनिष्ठ मध्यमवर्गीय ब्राह्मण आढळतात. विविध शिक्षणसंस्थांच्या देणग्या आणि शिष्यवृत्त्यांची यादी पाहिली तर चित्पावन ब्राह्मणांइतकी दानशूर जमात दुसरी कोणतीही नाही, असे आढळेल. या देणग्यांच्या रकमा लहान असतील, पण ती त्यांच्या आयुष्याची सारी पुंजी होती. कोटींनी कमावून लाखात देणग्या देणाऱ्यांपेक्षा हजारात कमावून हजारात देणग्या देणारे लोक अधिक मोठ्या मनाचे आहेत, हे ध्यानात घेतले पाहिजे. कोणताही कुलवृत्तांत पाहिला तरी हे चित्र दिसते. त्यामुळै सर्व जाती जमातीतील सर्व आडनावांच्या लोकांनी आपले कुलवृत्तांत प्रसिद्ध करायला हवेत. टॉलस्टॉयच्या वॉर अँड पीस या कादंबरीतील पहिलेच वाक्य सर्व सुखी कुटुंबे सारखी असतात, पण सर्व दु:खी कुटुंबांची दु:खे मात्र प्रत्येकाची वेगळी असतात अशा अर्थाचे आहे. इतिहासाचेही तसेच असते. सर्व मोठ्या लोकांच्या यशोगाथा सारख्या असतात. सामान्यांचा इतिहास मात्र वेगवेगळा असतो. कुलवृत्तांत हा असा एकाच सामान्य समूहाचा, त्यांच्या यशापयशाचा इतिहास असतो, तो जतन करायला हवा.
कुलवृत्तांत हे काम अतोनात कष्टाचे, अतोनात खर्चाचे, भलेपणाची अपेक्षा ठेवता निष्काम कर्मयोग म्हणून करण्याचे आहे. पी.एच.डी. च्या प्रबंधाला लागणाऱ्या कष्टापेक्षा यात अधिक परिश्रम असतात. मात्र कुलवृत्तांत तयार करणाऱ्यांना कुणी लेखक म्हणत नाही, संपादक म्हणत नाही की संशोधक म्हणत नाहीत. या प्रकारची उपेक्षा होण्याला कुलवृत्तांत तयार होण्याची रीतही जबाबदार आहे. मिळेल ती आणि मिळेल तेवढी माहिती गोळा करून त्याची जंत्री प्रकाशित करण्यापासून कोणती माहिती गोळा करावयाची हे ठरवून काम करण्यापर्यंत सर्व नमुने त्यात पाहावयास मिळतात. त्या दृष्टीने देवधर कुलवृत्तांताची नवी आवृत्ती खूप चांगली आहे. तथापि बहुसंख्य कुलवृत्तांतात आधीचे नमुने पहायचे आणि त्यानुसार आपला कुलवृत्तांत तयार करायचा असा प्रकार चालतो. मात्र आधीचा नमुना चांगला किंवा आदर्श आहे की नाही किंवा आदर्श नमुना कसा असावा याबाबत कुणी विचारच करीत नाही. याचा परिणाम असा होतो की आपल्या आडनावाची आस्था म्हणून केलेल्या उपक्रमात अभिमान बाळगावा अशा व्यक्तींच्या नोंदीच सापडत नाहीत. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करणारे काशीचे महापंडित गागाभट्ट यांचे चुलते कमलाकरभट्ट हे मोठे पंडित होते. त्यांच्या शिष्यांमध्ये अनंतभट्ट चितळे असे नाव आढळते. मात्र आजच्या कोणत्या चितळ्यांचे ते कोण हे समजत नाही. शिवाजी महाराजांच्या तोफखान्यात केळकर आडनावाचा अधिकारी होता. त्याची माहिती केळकर कुलवृत्तांतात नाही. इंग्रजांचे जहाज लुटल्याबद्दल जेरबंद करून आणून विसाजीपंत लेल्याला थोरल्या माधवराव पेशव्यांनी चाबकाचे फटके मारले, त्याला लाखो रुपयांचा दंड ठोठावून धुळीला मिळविले, असा उल्लेख मिळतो. तथापि वसईच्या परिसरातील कारभार पहाणारा विसाजीपंत लेले हा इंग्रजांची वाढती शक्ती अोळखणारा आणि तिला पायबंद घालण्याचा प्रयत्न करणारा मराठेशाहीतील एकमेव मुत्सद्दी होता. त्याचा ठावठिकाणा लेले कुलवृत्तांतात नाही. खानदेशातील डोंगरी टोळीप्रमुखांच्या उठावांना आळा घालण्यासाठी पेशव्यांनी धाडलेल्या शिवभट साठे आणि वीरेश्वर गाडगीळ या पराक्रमी वीरांचा उल्लेख साठे आणि गाडगीळ कुलवृत्तांतात सापडत नाही. एक तर अशा लोकांचा निर्वंश झालेला असणे शक्य आहे किंवा त्यांच्या वंशजांना पराक्रमी कर्तबगार पूर्वजांचे विस्मरण झाले असणे शक्य आहे. त्यामुळे यापुढील काळात होणारे कुलवृत्तांत अधिक शास्त्रशुद्ध झाले पाहिजेत. दर दहा वर्षांनी शिरगणती होते, तशा पद्धतीने सर्व कुलमंडळांनी आपापला आढावा घ्यायला पाहिजे. चित्पावन संघांसारख्या संस्था त्यात पुढाकार घेऊन त्यात सुसूत्रीकरण करू शकतील. किंबहुना सर्वच जातीसंस्थांनी आपापल्या जातीतील आडनावांबाबत अशा प्रकारचे दशवार्षिक आढावे घेतले पाहिजेत.

(कुलवृत्तांत करायचा ठरविल्यानंतर हा कशासाठी असा अनेकांना प्रश्न पडतो, तसेच कुलवृत्तांत कसा करायचा, आदर्श कुलवृत्तांत कोणता? यासारख्या प्रश्नांची उत्तरे देणारा हा माहितीपूर्ण लेख ज्येष्ठ पत्रकार कै. वरुणराज चिंतामणी भिडे, तत्कालीन सहसंपादक सकाळ, पुणे यांनी १९९८ मध्ये प्रकाशित झालेल्या गोडबोले कुलवृत्तांतासाठी लिहिला होता.)